रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा ‘जीएमसी’त गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:47 PM2019-11-15T14:47:37+5:302019-11-15T14:47:52+5:30
नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : किडनीच्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात घडली. यावेळी रुग्णाच्या संतापलेल्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथील रहिवासी रामेश्वर बोर्डे (४५) यांना किडनीची समस्या असल्याने त्यांना गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांची सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रामेश्वर बोर्डे यांच्या नातेवाइकांनी त्यांना सोनोग्राफीसाठी सोनोग्राफी कक्षात नेले; परंतु त्या ठिकाणी एकही सोनोग्राफी तंत्रज्ञ किंवा डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णाला तेथेच तात्कळत बसावे लागल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली. रुग्णाच्या पोटाचा त्रास वाढल्याने नातेवाइकांनी त्यांना वार्ड क्रमांक सहा मध्ये नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली; परंतु उपचारादरम्यान रामेश्वर बोर्डे यांचा मृत्यू झाला. योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सुरक्षा गार्डच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली.