रुग्णाच्या भेटीसाठी नातेवाईकाचा जीएमसीत राडा; खिडकी, दरवाजाच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:20 PM2021-04-24T16:20:42+5:302021-04-24T16:20:50+5:30
Akola GMC : कोविडच्या अतिदक्षता वॉर्डात दाखल रुग्णाला बघण्यासाठी आतमध्ये जाऊ द्या, अशी मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकाने शनिवारी दुपारच्या सुमारास वॉर्डाच्या काचा फोडत चांगलाच राडा केला.
अकोला: कोविडच्या अतिदक्षता वॉर्डात दाखल रुग्णाला बघण्यासाठी आतमध्ये जाऊ द्या, अशी मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकाने शनिवारी दुपारच्या सुमारास वॉर्डाच्या काचा फोडत चांगलाच राडा केला. यामध्ये येथील महिला सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली होती. जखमी महिला कर्मचाऱ्याने संबंधीत नातेवाईकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २९ मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून या ठिकाणी कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवर उपचार केला जातो. या ठिकाणी रुग्णावर उपचार होत नाही, असे म्हणत रुग्णाच्या नातेवाईकाने अतिदक्षता विभागात जाण्याचा हट्ट केला होता. परंतु, त्याला आत जाण्यास नकार दिल्याने त्याने वॉर्ड क्रमांक २९ च्या खिडकी आणि दरवाजाच्या काचा फोडल्याचा प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास घडला. या घटनेत वॉर्डातील महिला सुरक्षा रक्षकाच्या हाताला आणि डोक्याला काच लागल्याने त्या जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी जखमी महिला कर्मचाऱ्याने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईका विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनी घटनास्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्था आणखी चोख करण्याचे निर्देश दिले.