‘पीएम’ आवास योजनेचे निकष शिथिल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 01:36 AM2017-07-06T01:36:02+5:302017-07-06T01:36:02+5:30

खासदार, आमदार, महापौरांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

Relax the 'PM' housing scheme criteria! | ‘पीएम’ आवास योजनेचे निकष शिथिल करा!

‘पीएम’ आवास योजनेचे निकष शिथिल करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पंतप्रधान आवास योजनेचा आवाका व पात्र लाभार्थींची संख्या पाहता त्यांना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी योजनेचे निकष शिथिल करण्याचा प्रस्ताव खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर व महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. यासह महापालिकेच्या विविध मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मनपा क्षेत्रात जुने शहरातील शिवसेना वसाहत, न्यू गुरुदेव नगर, रामदासपेठ परिसरातील माता नगर आदी भागातील १ हजार २४१ घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यात आली. योजनेचे क्लिष्ट स्वरूप व पात्र लाभार्थींची संख्या पाहता घरे, इमारतींचे बांधकाम करण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जात आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी निकष शिथिल करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. शहराच्या हद्दवाढीमुळे मनपात सामील झालेल्या नवीन भागाच्या विकासासाठी ३१० कोटींचा आराखडा सादर करण्यात आला असून, त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. मनपाची नवीन इमारत उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला असून, जागेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावासोबतच जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल, सिटी बस स्टँडसाठी आरक्षणाची तरतूद आहे. जुना भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे आरक्षण असून, प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

शहर विकासाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. लाभार्थींना ‘पीएम’आवास योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश आहे. त्यासाठी काही निकष बदलण्याची आमची तयारी आहे. शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
-विजय अग्रवाल, महापौर.

 

Web Title: Relax the 'PM' housing scheme criteria!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.