हगणदरीमुक्ती फक्त कागदावरच!
By Admin | Published: July 7, 2017 01:42 AM2017-07-07T01:42:58+5:302017-07-07T01:42:58+5:30
मनपाच्या मोहिमेला तडा : हगणदरीमुक्त शहराचे वास्तव; उघड्यावर शौच सुरूच !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराला नुकतेच हगणदरीमुक्त घोषित केले आहे या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने गुरूवारी सकाळी हगणदरीमुक्तीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्टिंग आॅपरेशन राबविले असता घरी शौचालय बांधल्यावरसुद्धा नागरिक उघड्यावर शौच करीत असल्याचे चित्र समोर आले. उघड्यावर शौच केल्यामुळे जीवघेण्या आजारांचा फैलाव होतो ही जाणीव असतानाही हगणदरीमुक्तीसाठी सुरू केलेल्या महापालिकेच्या मोहिमेला नागरिकांच्या असहकार्यामुळे तडा जाण्याची चिन्हे आहेत. तसेच या प्रकारामुळे पावसाळ््यात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.
उघड्यावर शौच केल्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. साथरोगांचा पावसाळ््यात झपाट्याने फैलाव होत असल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण भागाप्रमाणेच आता महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे महापालिकांना उद्दिष्ट दिले. यासाठी पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करण्यात आले. काही बहाद्दर लाभार्थींनी खात्यात पैसे जमा झाल्यावर दुसऱ्याच खासगी कामांसाठी वापरल्याचे मनपाच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली.
नवीन प्रभागांसहित मनपा क्षेत्रात १८ हजार पेक्षा जास्त शौचालय बांधण्यात आली असली तरी काही नागरिक घरी शौचालय बांधल्यावरही उघड्यावर शौचास बसत असल्याचा प्रकार लोकमत चमूच्या पाहणीत समोर आला आहे.
या प्रकारामुळे शहराला मिळालेल्या हगणदरीमुक्त शहराच्या लौकिलाही तडा जात आहे. महापालिकेचे प्रामाणीक प्रयत्न असेल तरी काही नागरीकांच्या असहकार्यामुळे हगणदरीमुक्ती फक्त कागदावरच दिसत आहे.
पथकांची नियुक्ती केली; पण...
घरी शौचालय बांधल्यानंतरही उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने प्रभावी उपाययोजना केल्याचे दिसून येते. प्रभागनिहाय २० पथकांची नेमणूक करण्यात आली असून, एका पथकात १० सदस्य याप्रमाणे २०० आणि त्यांच्या दिमतीला बचत गटाच्या दोनशे महिला याप्रमाणे ४०० जणांचा फौजफाटा तयार आहे. यामध्ये मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सुरक्षा रक्षकांचा समावेश असून, आवश्यक त्या ठिकाणी नगरसेवकांची मदत घेतली जात आहे. तरीही नागरिक उघड्यावर बसत असतील तर मनपाने कठोर कारवाई करावी, असा सूर उमटत आहे.
या ठिकाणी हवा प्रतिबंध!
कृषी नगरलगतचा रेल्वे रूळ, आरटीओ रोड, नीळकंठ सूतगिरणीचा परिसर, शिवणी, शिवर, नायगाव, गुडधी, मोठी उमरी, सोमठाणा, अकोली बु., खरप, शिलोडा, नायगाव, अकोट फैल रेल्वे रूळ परिसर, मलकापूर, डाबकी आदी भागात नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी मनपाच्या पथकांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
७२ हजार नागरिकांचा वावर संपुष्टात
मनपाने शहरात १८ हजार कुटुंबांना शौचालये बांधून दिली. अर्थात एक ा कुटुंबात चार व्यक्ती गृहीत धरल्यास घरी वैयक्तिक शौचालय नसल्यामुळे नाइलाजाने उघड्यावर शौचास बसणाऱ्या तब्बल ७२ हजार नागरिकांचा वावर संपुष्टात आल्याचे दिसून येते. महापालिकेसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
--