उतावळी धरणाचे पाणी मन नदीत सोडा!
By Admin | Published: December 29, 2014 12:57 AM2014-12-29T00:57:10+5:302014-12-29T00:57:10+5:30
बंधारे पडले आहेत कोरडे : सिंचनासाठी शेतक-यांची मागणी.
तुलंगा बु. (पातूर, जि. अकोला) : यावर्षी पावसाळय़ात अल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी धरणातील पाणी मन नदीत सोडण्याची मागणी पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील सांगोळा, लावखेड, निमखेड, चांगेफळ, शहापूर, तुलंगा, तांदळी आदी गावे मन नदीच्या काठावर वसलेली आहेत. या गावांतील लोकांना मन नदीचे पाणी हे वरदान ठरले आहे. तथापि, यावर्षी पावसाळय़ात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ही नदी हिवाळय़ातच कोरडी पडली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने परिसरातील शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता या शेतकर्यांना रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा व इतर फळवर्गीय पिकांपासून आशा आहेत. या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. दरवर्षी मन नदीला पाणी असते; परंतु यावर्षी नदी आटल्यामुळे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाअभावी परिसरातील हिरवीगार पिके सुकू लागली आहेत. हिवाळय़ातच ही स्थिती आहे, तर उन्हाळय़ात काय हाल होतील, अशी साधार भीती लोकांना आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई भासू नये तसेच गुरा-ढोरांसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी उतावळी धरणाचे पाणी मन नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.