रिलायन्स जिओचे केबल जप्त; महापालिकेची कारवाई वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:57 PM2019-01-09T12:57:13+5:302019-01-09T12:57:41+5:30
अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली.
अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली. शहरात इतरही कंपन्यांकडून अवैधरीत्या के बलचे जाळे टाकल्या जात असल्यामुळे प्रशासनाची कारवाई वादाच्या भोवºयात सापडली आहे.
तापडिया नगर परिसरात रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून पोलवरून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात होते. या कामासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने मनपाची परवानगी घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे व अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी केबल जप्त करण्याची कारवाई केली.
जलवाहिनी फोडली तरीही...
रिलायन्स कंपनीच्या खोदकामात खडकी रोडवरील मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी ऐन पाणीटंचाईच्या काळात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. याप्रकरणी भाजप नगरसेवक विजय इंगळे यांच्या तक्रारीवरून जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी खदान पोलीस ठाण्यात रिलायन्स कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार नोंदविली होती, तसेच पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला, तरी आजपर्यंतही कंपनीने दंडात्मक रकमेचा भरणा केला नाही. याप्रकरणी कंपनीला सत्तापक्षातील पदाधिकाºयांचे अभय असल्याची चर्चा आहे. आता नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस रिलायन्स कंपनीकडून दंडात्मक रकम वसूल करतात की अभय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.