रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:44 PM2020-01-01T13:44:28+5:302020-01-01T13:44:39+5:30

आयुक्तांच्या निर्णयामुळे कंपनीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

Reliance, Sterlite cable will be inspected! | रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी!

रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी!

Next

अकोला: शहराच्या विविध भागात खोदकाम करून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने टाकलेल्या केबलची तपासणी करण्याचा आदेश मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिला. आयुक्तांच्या निर्णयामुळे कंपनीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.
शासनाच्या महानेट प्रकल्पांतर्गत शहरात २६ किमी अंतराचे केबल टाकण्याचा कंत्राट स्टरलाइट टेक कंपनीला देण्यात आला आहे. शासनाचा प्रकल्प असल्यामुळे रिस्टोरेशन चार्ज आकारण्याची आवश्यकता नसल्याचा शोध कंपनीसह महापालिका प्रशासनाने लावल्यामुळे मनपाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यादरम्यान, स्टरलाइट कंपनीच्या सोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडूनही शहरात मनपाच्या परवानगीशिवाय फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची बाब समोर आली. यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने दोन्ही कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांनी टाकलेले केबल शोधण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले होते. यामध्ये मनपाने स्टरलाइट कंपनीचे केबल तपासण्याचे काम पूर्ण केले. यादरम्यान रिलायन्स कंपनीने मनपाच्या तपासणीपासून चार हात लांब राहणे पसंत केले. ही बाब समोर येताच मंगळवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स कंपनीने आतापर्यंत शहरात टाकलेल्या संपूर्ण केबलची तपासणी करण्याचा आदेश बांधकाम विभागाला जारी केला.


२०१४ मधील कामाचा नकाशा सादर?
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दोन्ही कंपन्यांना त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. यामध्ये स्टरलाइट कंपनीच्या तपासणीचा अहवाल सादर झाला असून, रिलायन्स कंपनीने २०१४ मधील केबलच्या कामाचा नकाशा सादर केल्याची मनपात चर्चा आहे.


...तर दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींवर गुन्हा!
स्टरलाइट कंपनीच्या केबलची तपासणी केली असता दोन ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. रिलायन्स कंपनीने मनपाला सहकार्यच केले नसल्याची बाब लक्षात घेता, वेळप्रसंगी दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. तत्पूर्वी मनपाने २३ व २४ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापकांविरोधात तक्रार नोंदविली असली तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष.

 

Web Title: Reliance, Sterlite cable will be inspected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.