रिलायन्स, स्टरलाइट कंपनीचे काम बंद करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:20 PM2019-12-27T15:20:43+5:302019-12-27T15:20:45+5:30
३१ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम जमा न केल्यास कंपनीच्या व्यवस्थापकांसह नियुक्त केलेल्या ‘व्हेंडर’विरोधात फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिले.
अकोला: शहरात मनमानीरीत्या खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनी तसेच स्टरलाइट कंपनीचे खोदकाम बंद करण्याचा आदेश गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला. दोन्ही कंपन्यांनी आजवर केलेल्या खोदकामाचे मोजमाप करून त्यांच्यावर दंडाची आकारणी करा, ३१ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम जमा न केल्यास कंपनीच्या व्यवस्थापकांसह नियुक्त केलेल्या ‘व्हेंडर’विरोधात फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिले.
राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरात २६ किलोमीटर अंतराचे खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकण्याचा कंत्राट स्टरलाइट टेक कंपनीला देण्यात आला आहे. मनपाने सदर कंपनीला सिंगल पाइपद्वारे सिंगल केबल टाकण्याचा प्रस्ताव ९ डिसेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. खोदकामादरम्यान स्टरलाइट कंपनीकडून सिंगल पाइपऐवजी दोन पाइप टाकल्या जात असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त मनपाच्या परवानगीला धाब्यावर बसवित रिलायन्स जिओ इन्फोटेक कंपनीकडूनही अवैधरीत्या खोदकाम करून केबल टाकल्या जात होते. ‘लोकमत’ने हा गुंतागुंतीचा घोळ चव्हाट्यावर आणल्यानंतरही मनपाच्या बांधकाम विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून खोदकामाच्या तपासणीला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास येताच आमदार रणधीर सावरकर यांनी फोर-जीच्या तपासणीचे निर्देश दिले. याप्रकरणी मनपाने स्थळ निरीक्षण केल्यानंतर फोर-जी केबलसाठी रिलायन्स कंपनीचे चक्क चार तसेच स्टरलाइट कंपनीचे दोन असे एकूण सहा पाइप आढळून येताच कंपन्यांचे पितळ उघडे पडले. हा गंभीर प्रकार उजेडात आल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी मनपात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने स्टरलाइट कंपनीचे व्यवस्थापक नरेश वाघेला, प्रफुल्ल काळणे, रिलायन्सचे व्यवस्थापक नरसिंग ठाकूर तसेच अभियंता सोनोने यांच्यासह मनपाच्या बांधकाम व जलप्रदाय विभागातील उपअभियंता उपस्थित होते.
व्यवस्थापक म्हणाले, आमचे पाइप चोरीला गेले!
मनपाला मुख्य रस्त्यालगत खोदकामादरम्यान एक-दोन नव्हे, तर चक्क सहा पाइप आढळून आले होते. त्यातील दोन पाइप आमचे असल्याची कबुली स्टरलाइट कंपनीने दिली होती. उर्वरित चार पाइप रिलायन्सचे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मनपा आयुक्तांच्या दालनात दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापकांनी मनपाला आढळून आलेले पाइप आमचे नसल्याचे सांगताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आमचे पाइप चोरीला गेले होते, असा खुलासा दोन्ही व्यवस्थापकांनी केल्यावर सदर खोदकाम आपोआप झाले का, असा प्रतिप्रश्न आयुक्त कापडणीस यांनी केला असता, दोन्ही व्यवस्थापकांनी चुप्पी साधली.
म्हणे, रिलायन्सला २०१४ मध्येच परवानगी!
मनपाने २३ व २४ डिसेंबर रोजी रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक प्रयागदत्त मिश्रा व नरसिंग ठाकूर यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली. आयुक्तांच्या दालनात हजेरी लावलेल्या नरसिंग ठाकूर यांनी शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी मनपाने २०१४ मध्ये दिलेल्या परवानगीचा दाखला देत, या परवानगीनुसार केबल टाकल्या जात असल्याचे नमूद केले. यावेळी ठाकूर यांच्या वक्तव्याची इतिवृत्तात नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच २०१४ च्या परवानगीचा खोदकामाशी संबंध नसल्याची सावरासावर केली.