मुख्य रस्त्यालगतचे धार्मिक स्थळ पहाटे ५ वाजता हटवले!
By admin | Published: April 25, 2017 01:04 AM2017-04-25T01:04:11+5:302017-04-25T01:04:11+5:30
मनपाची कारवाई : सरकारी बगिचा ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे होणार रुंदीकरण
अकोला: मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या सरकारी बगिच्याजवळील धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सोमवारी पहाटे ५ वाजता महापालिका प्रशासनाने केली. मुख्य रस्त्यांलगत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण असल्यास नागरिकांनी स्वत:हून काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये प्राप्त होत असताना रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे अकोलेकरांना अपेक्षित आहे. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. मुख्य रस्त्यांना लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी विळखा घालण्यासोबतच रस्त्यांलगत धार्मिक स्थळांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खदान पोलीस ठाणे ते सिंधी कॅम्प मार्गावर चक्क रस्त्यावर धार्मिक स्थळे असल्याने या ठिकाणी स्थळे हटवण्याची कारवाई रविवारी पार पडली. त्यापाठोपाठ मनपाने सरकारी बगिचानजीकचे मोठे धार्मिक स्थळ हटवले. पहाटे ५ वाजता धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, श्याम बगेरे, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे यांनी कारवाई पार पाडली.
आधी पाइपलाइन आता रस्ता रुंदीकरण!
सरकारी बगिचा ते थेट अशोक वाटिकापर्यंत मुख्य रस्त्यालगत महापालिका प्रशासनाने जलवाहिनीचे नवीन जाळे टाकले. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अशोक वाटिका ते सरकारी बगिचा या मुख्य रस्त्याचे निर्माण होत आहे. या रस्त्यालगत पाइपलाइनचे जाळे टाकल्यानंतर आता रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. विकास कामांची हीच योग्य पद्धत असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला.