धार्मिक स्थळांलगतचे अतिक्रमण जमीनदोस्त
By admin | Published: November 6, 2016 02:13 AM2016-11-06T02:13:15+5:302016-11-06T02:13:15+5:30
पोलीस बंदोबस्तात अकोला महापालिकेची ऐतिहासिक कारवाई
अकोला, दि. ५- महापालिकेच्या किसनबाई भरतीया रुग्णालयाची जागा तसेच फतेह अली चौकातील धार्मिक स्थळांलगतच्या जागेवर उभारलेले पक्के अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची ऐतिहासिक कारवाई शनिवारी महापालिका प्रशासनाने पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे महापालिकांना निर्देश आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली. मध्यंतरी या कारवाईला ह्यब्रेकह्ण देण्यात आला होता. सणासुदीचे दिवस संपताच मनपा प्रशासनाने शनिवारपासून धार्मिक स्थळे व त्याच्या आडोशाने उभारलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. काश्मीर लॉजनजीकच्या फतेह अली चौकात लाल बंगला ट्रस्टच्या नावे असलेल्या धार्मिक स्थळाच्या बाजूला अतिक्रमित जागेवर हॉल उभारण्यात आला होता. मनपाच्या मालकीच्या किसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवरील धार्मिक स्थळाच्या बाजूलाही प्रार्थना करण्यासाठी अतिक्रमित जागेवर हॉल बांधण्यात आला होता. मनपाच्या इतिहासात प्रथमच या दोन्ही धार्मिक स्थळांच्या बाजूला उभारण्यात आलेले अतिक्रमण धाराशायी करण्यात आले.
स्थगनादेशामुळे यंत्रणा हतबल
शहरात अतिक्रमित जागेवर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविणे अपेक्षित असताना त्यांनी न्यायालयाकडून स्थगनादेश मिळविल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशावेळी संबंधित स्थळांवर कारवाई करताना मनपाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. याबद्दल उपस्थित अधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली.
खारी बावडीचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश
किसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवर किराणा मार्केट (खारी बावडी) आहे. जिल्हा प्रशासन तसेच मनपाने कधी व किती वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली, याचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी व्यावसायिकांना यावेळी दिले.
आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई
जुन्या बसस्थानकानजिक फतेह अली चौकातील धार्मिक स्थळाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी पक्के अतिक्रमण उभारण्यात आले. मुख्य रस्त्यालगत असणार्या सदर अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. मनपाच्या मालकीच्या असलेल्या किसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवरील धार्मिक स्थळाच्या बाजूला प्रार्थना करण्यासाठी पक्के अतिक्रमण उभारले होते. या दोन्ही ठिकाणी कारवाई करताना महापालिका आयुक्त अजय लहाने सायंकाळपर्यंत उपस्थित होते.
मनपा, पोलिसांची संयुक्त मोहीम
अतिक्रमण काढताना महापालिका व पोलीस प्रशासनात कमालीचा समन्वय दिसून आला. मनपाच्यावतीने उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र घनबहाद्दूर, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे, विधी विभाग प्रमुख श्याम ठाकू र यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील माने, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे व पोलीस क र्मचारी उपस्थित होते.