उपाययोजना खोळंबल्या; पाण्यासाठी पायपीट!
By admin | Published: April 10, 2016 01:38 AM2016-04-10T01:38:08+5:302016-04-10T01:38:08+5:30
पाणीटंचाई निवारणाची ९७१ कामे प्रलंबित: केवळ १८ कामे पूर्ण.
संतोष येलकर / अकोला
तापत्या उन्हाच्या पार्यासोबतच जिल्हय़ातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात ५९९ गावांमध्ये हजारावर उपाययोजना मंजूर असल्या तरी; त्यापैकी प्रत्यक्षात शनिवारपर्यंत केवळ १८ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली असून, १२ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. उर्वरित ९७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित असून, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे खोळंबल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्हय़ातील धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हय़ातील विविध भागात तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईची परिस्थिती तीव्र होत आहे. त्यामध्ये जिल्हय़ातल्या खारपाणपट्टय़ातील ज्या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नसलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, अनेक गावात बैलगाडी, सायकल, ऑटोमधून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी ५९९ गावांमध्ये १ हजार एक उपाययोजनांच्या कामांसाठी २४ कोटी ८२ लाख ९२ हजार रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकार्यांनी मंजूर केला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी विविध हजारांवर उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर असला तरी ८ एप्रिलपर्यंत जिल्हय़ात केवळ १८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, १२ उपाययोजनांची कामे सुरू आहेत.