बदली रद्द करण्यासाठी शिफारस आल्यास लक्षात ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:56+5:302021-07-15T04:14:56+5:30
मनपाच्या बांधकाम विभागाअंतर्गत शहरात दरवर्षी किमान २५ काेटी रुपयांची विकासकामे केली जातात. यामध्ये २० काेटींचा निधी शासनाकडून, तर उर्वरित ...
मनपाच्या बांधकाम विभागाअंतर्गत शहरात दरवर्षी किमान २५ काेटी रुपयांची विकासकामे केली जातात. यामध्ये २० काेटींचा निधी शासनाकडून, तर उर्वरित मनपा निधीचा वापर केला जाताे. रस्ते, नाल्या, पेव्हर ब्लाॅक, धापेे, विद्युत खांब उभारणे, सामाजिक सभागृह, उद्यानांचे साैंदर्यीकरण, आदी विकासकामांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय आराेग्य विभाग, तसेच इतर विभागामार्फत मंजूर कामे केली जातात. यावर देखरेख ठेवण्यासाठी बांधकाम विभागाने झाेननिहाय प्रत्येकी चार कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आउटसाेर्सिंगमार्फत नियुक्त झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांना एकाच झाेनमध्ये तीन वर्षांचा कालावधी झाल्यामुळे त्यांची झाेननिहाय बदली करण्याचा ताेंडी प्रस्ताव प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे मांडल्याचे बाेलले जाते. तसेच या अभियंत्यांची बदली करणे आवश्यक झाल्याचा मुद्दाही त्यांनी पद्धतशीरपणे समजावून सांगितला. त्या अनुषंगाने आयुक्त अराेरा यांनी अभियंत्यांच्या बदलीला हाेकार देताच अजय गुजर यांच्या दालनात कनिष्ठ अभियंत्यांच्या बदलीची यादी तयार करण्यात आली. या यादीवर आयुक्तांनी शिक्कामाेर्तब केले असून, २१ जुलैनंतर झाेननिहाय नियुक्त हाेण्याचे निर्देश जारी केले आहेत.
दबाव वाढताच अभियंते आयुक्तांच्या दालनात
२७ काेटींच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. यानंतरही सुमारे २२ काेटींच्या निधीतून विकासकामे प्रस्तावित करणे अद्याप बाकी आहे. अशा स्थितीत झाेनमधील कनिष्ठ अभियंत्यांची बदली हाेणार असल्याची बाब सर्वपक्षीय नगरसेवकांच्या जिव्हारी लागली आहे. यातूनच अजय गुजर यांच्यावर दबाव वाढताच त्यांनी सर्व अभियंत्यांना आयुक्तांच्या समाेर हजर करून त्यांचे कान टाेचून घेतल्याची माहिती आहे.