पोस्टर्स-बॅनर्स काढा; पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:19 PM2019-09-22T12:19:00+5:302019-09-22T12:19:09+5:30
राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पोस्टर्स, बॅनर्स ७२ तासांत काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत.
अकोला : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सरकारी कार्यालयांच्या इमारतींवर, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी इमारतींवर विनापरवानगी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात सरकारी कार्यालयांच्या इमारतींवरील राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट व झेंडे २४ तासांत काढावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे फलक ४८ तासांत काढण्यात यावे आणि खासगी मालमत्तेच्या इमारतींवर विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पोस्टर्स, बॅनर्स ७२ तासांत काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिका, नगरपालिकांसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची शासकीय वाहने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १ हजार ७०३ मतदान केंद्र असून, निवडणूक दरम्यान नागरिकांना कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्यास ‘सिव्हिजिल’ या अॅपद्वारे तक्रारी करता येणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर भरारी पथके, व्हिडिओ पाहणी पथके, स्थिर पथके, खर्च निरीक्षण पथके गठित करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड व निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड उपस्थित होते.
... तर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल होणार!
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने, सरकारी कार्यालय इमारतीवरील, सार्वजनिक ठिकाणी व खासगी इमारतींवर लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट व झेंडे विहित मुदतीत राजकीय पक्षांनी काढले नाही तर संबंधित यंत्रणांच्या पथकांमार्फत पोस्टर्स, बॅनर्स व झेंडे काढण्यात येतील आणि विहित मुदतीत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे न काढणाºयांविरुद्ध आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिली.