वाडेगाव मार्गावरील पाणी काढून तात्पुरता रस्ता मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:44+5:302021-06-16T04:26:44+5:30
वाडेगाव : अकोला-वाडेगाव मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील दोन ते तीन वर्ष उलटूनसुद्धा पूर्ण न झाल्याने वाडेगावजवळील निर्गुणा नदीला पहिल्याच ...
वाडेगाव : अकोला-वाडेगाव मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील दोन ते तीन वर्ष उलटूनसुद्धा पूर्ण न झाल्याने वाडेगावजवळील निर्गुणा नदीला पहिल्याच पावसात तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे प्रवासी, पादचारी व ग्रामस्थ त्रस्त झाले होते. याबाबत लोकमतने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच, जेसीबीने रस्त्यावरील पाणी काढून देत, रस्ता मोकळा करण्यात आला.
या रस्त्यासाठी युवक व ग्रामस्थांकडून अनेकदा रास्ता रोको, आंदोलन, निवेदन देण्यात आले. रस्ता लवकर दुरुस्ती करून ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. अकोला जाण्यासाठी जवळपास चान्नी चतारी, सस्ती, वाडेगाव, दिग्रस, तुलंगा, लावखेड, चिंचोली, तामसी, नकाशी, भरतपूर, माझोड, गोरेगाव आदी गावातील ग्रामस्थ ये-जा करतात. परंतु या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाने पुन्हा रस्ता खराब होण्याअगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्थानिक भाजपा उपाध्यक्ष सुनील मानकर यांनी रस्त्याच्या समस्येविषयी संबंधित अधिकाऱ्यास संपर्क साधला. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी पाठवून रस्त्यावरील पाणी काढून दिले. त्यामुळे रस्ता मोकळा झाला.
फोटो: