कंझरा ते आरखेड रस्त्यावरील गाळ काढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:19 AM2021-09-13T04:19:05+5:302021-09-13T04:19:05+5:30
मूर्तिजापूर : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे कमळगंगा नदीला पूर आला होता. कंझरा-आरखेड रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पुराचे ...
मूर्तिजापूर : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे कमळगंगा नदीला पूर आला होता. कंझरा-आरखेड रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर कमळगंगा नदीच्या पुलावर गाळ जमा झाला होता. त्यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात येताच जेसीबीद्वारे गाळ काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कंझरा ते आरखेड मार्गावरील पुलावर गाळ साचल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ त्रस्त होते, तसेच त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढली होती. कंझरा येथील सरपंच अनिता चंद्रकांत टोम्पे यांनी पुढाकार घेत जेसीबीद्वारे रस्त्यावरील गाळ हटवून काटेरी झुडपे काढली. या वेळी उपसरपंच नीलेश शंकरराव गिरी, निखिल चंद्रकांत टोम्पे, तुकाराम शेजोकार, बाबाशहा, आस्तिक नगोलकर, गजानन देशमुख, मन्सूर शाहा, दीपक कालेकर, मनोज पारसकर, सुनील पारसकर, नजवर शाह यांनी सहकार्य केले.
कमळगंगा नदीवरील पुलाची उंची कमी
कंझरा ते आरखेड रस्त्यावरील कमळगंगा नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने नागरिकांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पूर आल्यास या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कमळगंगा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--------------------
हॅपी वूमन्सने दिला निराधार महिलांना आधार
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मूर्तिजापूर : येथील ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्थाद्वारा संचालित विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर हॅपी वूमन्स क्लबद्वारा जुनी वस्ती येथील नगर परिषद घरकूल सामाजिक सभागृह सेंटर क्रमांक एक येथील निराधार महिला आधारगृह येथे महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, तूरडाळ, साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या वेळी अमिता तिडके, सुनीता लोडम, दीपाली देशमुख, अनिता गावंडे, जया टाले, राजकन्या खणखने, मनीषा यादव, आधारगृह अधीक्षिका छाया डोंगरे, नर्मदा प्रजापती, अश्विनकुमार कनोजे, क्षमा इंगळे, कल्पना तिडके, सोनल बांगड, माला जाजू, भाग्यश्री मुळे, पल्लवी मुळे, वैशाली पवार, आधारगृहातील लाभार्थी इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हॅपी वूमन्स क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. आभार विष्णू लोडम यांनी मानले.