निधीअभावी रखडले ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन!
By admin | Published: September 14, 2016 02:08 AM2016-09-14T02:08:26+5:302016-09-14T02:08:26+5:30
शासनाकडून साडेतीन कोटींचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातील हजार कर्मचारी वेतनापासून वंचीत राहीले आहेत.
संतोष येलकर
अकोला, दि. १३: शासनाकडून सहायक अनुदानापोटी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या ९९१ कर्मचार्यांचे वेतन अडकले आहे. त्यामुळे वेतनाचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचार्यांना घर, पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य इत्यादी ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत व गावातील नाल्या सफाई, नमुना-८ तयार करणे, गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी घेणे व दाखले तयार करणे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना पोहोचविणे इत्यादी कामे करावी लागतात. या कामापोटी ग्रामपंचायत कर्मचार्यांना दरमहा ५ हजार १00 रुपये वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वेतनाचा ५0 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि ५0 टक्के खर्च शासनामार्फत सहायक अनुदान निधीतून भागविला जातो. अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांत ५४२ ग्रामपंचायत स्तरावर ९९१ कर्मचारी कार्यरत आहेत. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वेतनासाठी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार ३00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत गत ऑक्टोबर २0१५ मध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला; मात्र शासनामार्फत अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांचे जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतन रखडले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना वेतनाविना राहावे लागत आहे. त्यामुळे वेतनापोटी सहायक अनुदानाचा निधी शासनामार्फत केव्हा मिळणार आणि निधीत अडकलेले वेतन केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.