१८०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी ६०० रुपये भाडे!

By admin | Published: July 12, 2017 01:16 AM2017-07-12T01:16:28+5:302017-07-12T01:16:28+5:30

मनपाच्या व्यावसायिक संकुलांपासून अवघे २९ लाखांचे उत्पन्न

Rent of 600 rupees for 1800 square feet area! | १८०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी ६०० रुपये भाडे!

१८०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी ६०० रुपये भाडे!

Next

आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या वाणिज्य संकुलांमधील भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी रेडिरेकनरनुसार दरवाढ करण्याचा निर्णय घेताच दुकानदारांनी थयथयाट सुरू केला. बाजारमूल्यानुसार ज्या दुकानांचे भाडे प्रति महिना किमान सात ते आठ हजार रुपये असणे अपेक्षित असताना १८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांसाठी अवघ्या ६०० रुपये महिना भाड्याची आकारणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. परिणामी मनपाच्या व्यावसायिक संकुलांमधील ४२६ दुकानांपासून केवळ २८ लाख रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे.
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार शहराच्या विविध भागांत मनपाच्या मालकीची १३ व्यावसायिक संकुले आहेत. त्यामधील ४२६ पेक्षा जास्त दुकाने, गाळे अत्यल्प भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या बदल्यात मनपाला अवघे २८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. संकुलांमध्ये भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना रेडिरेकनरनुसार भाडेपट्ट्यात सुधारित दरवाढ केल्यास मनपाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होईल,असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानुसार सुधारित दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचा असल्यामुळे सत्ताधारी भाजपाने व्यावसायिक संकुलांना सुधारित दरानुसार भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामध्ये शासकीय जागेवर उभारलेल्या दुकानांनासुद्धा भाडेवाढ लागू करण्याचा समावेश होता. हा प्रस्ताव मंजूर करताच प्रशासनाने लागू केलेल्या दराच्या नोटिसेस व्यावसायिकांना पाठवण्यात आल्या. प्रशासनाने लागू केलेले दर फार जास्त असल्यामुळे ते कमी करण्याची मागणी व्यावसायिकांनी लावून धरली. त्यावर मध्यंतरी महापौर विजय अग्रवाल यांनी भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानदारांना एकूण कराच्या रकमेतून २५ टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. यादरम्यान, आजच्या बाजारमूल्याप्रमाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांना किमान सात ते आठ हजार रुपये महिना भाडे आकारले जाते. शासकीय जागेवर तसेच मनपाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या दुकानांचे क्षेत्रफळ व त्यांना आकारलेले भाडे नगण्य असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत १८०० चौरस फूट असलेल्या दुकानाचे वार्षिक भाडे ७ ते ८ हजार रुपये अर्थात प्रति महिना केवळ ६०० रुपये असल्याची अचंबित करणारी माहिती समोर आली आहे.

शासनाच्या जागेवर ४७२ दुकाने
शहरात विविध ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर ४७२ दुकानांची उभारणी आहे. या सर्व जागा शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी आहेत. यामध्ये जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार (जैन मंदिर परिसर), टिळक रोड परिसर, खुले नाट्यगृह परिसर, टॉवर चौक आदींचा समावेश आहे. शासनाच्या जागेवरील दुकानांची देखभाल करण्याची जबाबदारी मनपाची असून, ४७२ दुकानांपासून मनपाला केवळ ३३ लाख रुपये उत्पन्न प्राप्त होते.

Web Title: Rent of 600 rupees for 1800 square feet area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.