मूर्तिजापूर-अकोला-खामगावच्या जुन्या महामार्गाची डागडुजी तीन महिन्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:18 PM2018-12-02T14:18:23+5:302018-12-02T14:26:10+5:30
अकोला: चौपदरी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून मूर्तिजापूर-अकोला-खामगाव या जुन्या महामार्गाची डागडुजी येत्या तीन महिन्यांत होईल, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अकोला: चौपदरी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून मूर्तिजापूर-अकोला-खामगाव या जुन्या महामार्गाची डागडुजी येत्या तीन महिन्यांत होईल, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अकोला-अमरावती रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे कार्यादेश जारी करण्यात आले असून, सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत अमरावती-चिखली बंद असलेल्या कामावर सकारात्मक चर्चा झाली. चौपदरी मार्ग निर्मितीचा कंत्राट घेणारी आयएल अॅण्ड एफएस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने सुरतला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अर्धवट स्थितीत पडला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करीत या मार्गाने पुढे जावे लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीशी वरिष्ठ स्तरावर तडजोड सुरू आहे; पण यातून जर तोडगा निघाला नाही, तर दुसऱ्या कंपनीला कंत्राट देऊन हे काम पूर्ण केले जाईल. तोपर्यंत पर्याय म्हणून जुन्या मार्गाची डागडुजी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अकोट-अकोला रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, अकोला-अकोट रस्त्याचे काम जलदगतीने होण्यासाठी कंत्राटदाराकडे सातत्याने पाठपुरावा करून दैनंदिन कामाचा अहवाल पाठविण्याचे त्यांनी सूचित केले. नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून तयार होणारा पातूर-बाळापूर-जळगाव जामोद या रस्त्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून प्रस्ताव पाठविण्यात यावा, तसेच खामगाव शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. अकोला-मेंडशी या चारपदरी रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.
कें द्रीय मंत्री गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर यांनी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहून रस्त्यांच्या कामाच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले. अकोला-मेडशी, मेडशी-वाशिम आणि वाशिम-पांगरे या राष्ट्रीय मार्गाच्या कामातील अडचणी जाणून घेण्यात आल्या. या रस्त्याशी संबंधित भूसंपादन व इतर शिफ्टिंगची (विद्युत पोल, जलवाहिन्या) कामे जलदगतीने पूर्ण करावीत, यासाठी जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेऊन वेळेत सर्व कामे मार्गी लावावीत, अशी सूचना देऊळगावकर यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातील वाशिम-पांगरे, पांगरे-वारंगा फाटा, अकोला जिल्ह्यातील अकोला-मेडशी या राष्ट्रीय मार्गासाठी भूसंपादन व इतर शिफ्टिंगची कामेही त्वरेने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रलंबित मार्गासाठी वन विभागाची आवश्यक ती परवानगी घेण्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस वाशिमच्या खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी निरूपमा डांगे, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आदींसह राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.