तुटू पाहणा-या ८१ संसारवेली समुपदेशनाने पुन्हा जुळल्या
By admin | Published: October 15, 2015 12:15 AM2015-10-15T00:15:47+5:302015-10-15T00:15:47+5:30
पाच प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल.
अनिल गवई / खामगाव : छोट्या-मोठय़ा कारणांवरून दाम्पत्यामधील होणारे व विकोपाला जाणारे वाद येथील महिला समुपदेशन केंद्राने वेळीच थांबवून तब्बल ८१ जणांचे संसार पुन्हा फुलविले आहेत. दीड वर्षात या केंद्रांतर्गत १८८ आनुषंगिक प्रकरणे आली. त्यात उभय बाजूंना परस्पर समन्वय व विश्वासाची जाणीव करून देत हे संसारवेल पुन्हा फुलविण्यात आले आहे. अन्य पाच प्रकरणांत पोलिसांत गुन्हेही दाखल करावे लागलेले आहेत. कौटुंबीक कलहातून झालेल्या तब्बल ८१ जोडप्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर लावण्यात शहर पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्राला यश आले होते. एका घरात राहायचे, तर ह्यभांड्याला भांडे लागणारह्णच. या उक्तीचा परिचय देत आता हे जोडपे पुन्हा आपल्या संसारात रमले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला तक्रार निवारण कक्षात बुलडाणा येथील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळाला ह्यसमुपदेशन केंद्रह्ण चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिला दिन आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १0 मार्च २0१४ रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात जीवनधारा संस्थेने एमएसडब्ल्यू झालेल्या स्वाती इंगळे, स्नेहल ठाकूर या दोन कर्मचार्यांना समुपदेशनासाठी नियुक्त केले आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षांंंंच्या कालावधीत घरगुती कलहाचे १८८ प्रकरणं समुपदेशन केंद्राकडे दाखल झाले. त्यापैकी ८१ दहा जोडप्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी समुपदेशन केंद्राला यश आले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील काही कौटुंबीक प्रकरणांचा समावेश आहे. तर केवळ पाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३६ प्रकरणांमध्ये कोर्टात जाण्यासाठी समज देण्यात आला असून, ३९ प्रकरणांची फाईल बंद करण्यात आली आहे. तर दोन प्रकरणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वळती करण्यात आली आहेत.