औषध दुकानावरील कामगारास मारहाण करणाऱ्या पोलिसांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:02+5:302021-05-18T04:20:02+5:30
अकोला : जीएमडी मार्केट येथील दत्त मेडिकलमध्ये कामाला असलेल्या नीलेश भाकरे नामक युवकास डाबकी रोड पोलीस ठाण्यातील सहायक ...
अकोला : जीएमडी मार्केट येथील दत्त मेडिकलमध्ये कामाला असलेल्या नीलेश भाकरे नामक युवकास डाबकी रोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे व जंगबहादूर यादव या दोघांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात दोन्ही पोलीस दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे.
नीलेश भाकरे हे जुने शहरातील एका मेडिकलवर औषधी साहित्य पोहोचविण्यासाठी रविवारी सायंकाळी जात होते. या दरम्यान शिवसेना वसाहतनजीक पोलीस बंदोबस्तास असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे व पोलीस कर्मचारी जंगबहादूर यादव या दोघांनी विनाकारण त्यांना अडवले. भाकरे यांनी जवळ असलेल्या मेडिकलची पिशवी त्यांना दाखविली; मात्र तरीही पोलिसांनी काहीही न एकता नीलेश भाकरे यांना काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर नीलेश भाकरे यांनी मेडिकलमध्ये काम करीत असल्याचे वारंवार सांगितले; मात्र तरीही पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोडत बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हातावर, पायावर, पाठीवर व डोक्यावर काठीने मारहाण केल्याने गंभीर जखमा आहेत. औषध दुकानावरील कामगारास मारहाण केल्याची माहिती दत्त मेडिकलचे संचालक ओम सावल व प्रकाश सावल यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा निषेध करीत पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील औषध दुकाने बंद करण्याचा इशारा दिला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन आंदोलन छेडले. त्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे व पोलीस कर्मचारी जंगबहादूर यादव यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली केली.