बोगस औषधांचा अहवाल गुलदस्त्यात
By admin | Published: September 16, 2014 06:18 PM2014-09-16T18:18:37+5:302014-09-16T18:18:37+5:30
पाच महिने उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.
अकोला : बॅच क्रमांक, परवाना, एमआरपी, एक्सापायरी डेट, मॅनिफॅ रर आणि सप्लायरसह लेबल नसलेल्या औषधांचा साठा मनसेच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी २९ एप्रिल रोजी मुख्य डाकघरात पकडला होता. त्यानंतर या औषधांचे नमूने चाचणीसाठी पाठविले होते. एका महिन्यात अहवाल येणे अपेक्षित असताना पाच महिने उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी २९ एप्रिल रोजी मुख्य डाकघर येथून पाठविण्यात येत असलेले औषधांचे ६00 पाकीट जप्त केले होते. गोरक्षण रोडवरील पूजा कॉम्प्लेक्सनजीक असलेल्या सिलीकॉन टॉवरमधील डॉ. राजेंद्र डाबरे यांच्या स्वाक्षरीनीशी त्यांच्या रुग्णालयाचे ठसे मारलेल्या या पाकीटातून बनावट औषधं पाठविल्या जात असल्याचा संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये एक आयुर्वेदिक पावडरचे पाकीट, तर पिवळय़ा आणि लाल रंगाचे अँलोपॅथी औषध होते. कुठल्याही औषधांची विक्री करताना त्यावर बॅच क्रमांक, लायसन्स क्रमांक, एमआरपी, एक्सापायरी डेट, मॅनिफॅ ररचे नाव, सप्लायर, लेबल व औषधींचे प्रीस्क्रिप्शन असणे बंधनकारक आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधांवर यापैकी कोणतीही माहिती नमुद केलेली नव्हती. सोबतच ही औषधं विदाऊट प्रीस्क्रिप्शन पाठविण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते. औषधं जप्त करण्यात आल्यानंतर नमुने चाचणीसाठी पाठविण्यात होते. चाचणीचा अहवाल एका महिन्यात मिळणे अपेक्षित होते. असे असतानाही पाच महिने उलटूनही चाचणीचा अहवालच मिळालेल्या
नाही.