पीक नुकसानीचा अहवाल अखेर शासनाकडे
By admin | Published: November 8, 2014 12:14 AM2014-11-08T00:14:11+5:302014-11-08T00:14:11+5:30
अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
अकोला : गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनंतर अखेर शुक्रवारी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.
यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यानंतर झालेला पाऊसही अल्प प्रमाणात झाला; मात्र गेल्या २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना तडाखा बसला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने, पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांमार्फत करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात आले, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर, पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल १ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तयार करण्यात आलेल्या पीक नुकसानीच्या या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये २३७ गावांमध्ये ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असून, १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्याच्या आत नुकसान झाले. अतवृष्टीनंतर तब्बल तीन महिन्याने, जिल्ह्यातल्या चार तालुक्यातील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अखेर शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी विभागीय शासनाकडे पाठविण्यात आला.
*७६३ हेक्टर जमीन खरवडून गेली!
अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ७६३ हेक्टर ५९ आर शेतजमीन खरवडून गेली. त्यामध्ये आकोट तालुक्यात १९२.0८ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ३१५.९४ हेक्टर, बाळापूर तालुक्यात २८.0१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात २२५.१५ हेक्टर शेतीचे क्षेत्र खरवडून गेल्याचेही पीक नुकसानीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
*नुकसानभरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा!
यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यातच अतवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्यांकडून केली जात आहे.