तीन तालुक्यातील पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे!
By admin | Published: March 13, 2015 01:35 AM2015-03-13T01:35:50+5:302015-03-13T01:35:50+5:30
गारपिटीमुळे १४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अकोला: गेल्या ३१ डिसेंबर व ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्हय़ातील पातूर, बाश्रीटाकळी व अकोला या तीन तालुक्यात १४२ हेक्टर ७ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गुरुवारी जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.
गत ३१ डिसेंबर आणि ९ जानेवारी रोजी जिल्हय़ातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे जिल्हय़ातील पातूर, बाश्रीटाकळी व अकोला या तीन तालुक्यात हरभरा, गहू, ओवा, कांदा, लिंबू, आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या पथकांकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अंतिम अहवालानुसार जिल्हय़ातील या तीनही तालुक्यात १२ गावांमध्ये ९४६ शेतकर्यांचे १४२ हेक्टर ७ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.