यंदा रिपब्लिकन सेना जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:14 PM2018-08-04T14:14:06+5:302018-08-04T14:16:35+5:30
अकोला : यंदाची अकोला जिल्हा परिषद निवडणूक रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.
अकोला : यंदाची अकोला जिल्हा परिषद निवडणूक रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पातोडे यांनी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनाची काय भूमिका राहणार आहे, याबाबत माहिती दिली. येत्या काही महिन्यातच अकोला जिल्हा परिषदनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघ ५३ ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र, रिपब्लिकन सेनासाठी काही जागा सोडण्यात याव्यात, अशा मागणीचा प्रस्ताव भारिपकडे दिला जाणार आहे. जर भारिपने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पातोडे यांनी स्पष्ट केले.
एकीकडे भारिपला नुकसान होईल, असे काम रिपब्लिकन सेना करणार नाही, असेही पातोडे यांनी स्पष्ट करू न, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय घेतले जाणार असल्याचेही पातोडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अॅड़ गजानन तेलगोटे, अनिल गवई, संजय डोंगरे, योगेंद्र चवरे, संदेश गायकवाड, स्वप्निल सोनोने, शांताराम गोपनारायण, मो. साकीब, आकाश चोटमल, मिलिंद जाधव, दिलीप दंदी, संदेश बोदडे आदी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेडकर बंधू एकमेकांविरोधात लढणार!
भारिप-बहुजन महासंघ गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळासाठी जिल्हा परिषदेत सत्तेत आहे. भारिप-बहुजन महासंघाचा अकोला जिल्हा बालेकिल्ला आहे, तर रिपब्लिकन सेनेचे अस्तित्व जिल्ह्यातील काही भागातच आहे. तरीही अकोला जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघाला रिपब्लिकन सेनाने आव्हान देणे म्हणजेच अॅड़ प्रकाश आंबेडकर विरोधात आनंदराज आंबेडकर असा सामना अकोला जिल्हा परिषद निवडणूकमध्ये दिसणार आहे.