पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन
By Atul.jaiswal | Published: July 19, 2023 02:28 PM2023-07-19T14:28:43+5:302023-07-19T14:29:00+5:30
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात आणले.
अकोला : संततधार पावसामुळे मुर्तीजापूर तालुक्यातील नदी-नाल्यांना पुर आला असून, चिखली व खरब ढोरे या गावांना पुराचा वेढा बसला आहे. खरब ढोरे येथील एक शेतकरी गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतात पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात आणले.
खरब ढोरे आणी चिखली ही दोन गावे रात्री तीन वाजता पासुन पुराने वेढल्या गेली. यात अडकलेल्या ग्रामस्थ व जनावरांचे रेस्क्यु करण्यासाठी मुर्तीजापूर उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार बोबडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले. क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, अंकुश सदाफळे, ज्ञानेश्वर म्हसाये, शरद महल्ले, मयुर कळसकार, महेश वानखडे, शिवम वानखडे,दिपक गांजरे,ऋतीक सदाफळे,यांचेसह शोध व बचाव साहित्यासह रेस्क्यू बोट घेऊन चिखली येथे घटनास्थळी दाखल झाले.
तेथील परीस्थिती नियंत्रणात आणुन लगेचच खरब ढोरे येथे रेस्क्यु टीम दाखल झाली. अर्ध्या गावाला पुराने वेढले होते. अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. यावेळी गावातील बाजीराव उईके (४५) हा शेतकरी रात्रीपासून पुराने वेढलेल्या शेतात अडकून पडल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करत शेताच्या दिशेन रबरी बोट मार्गस्थ केली. पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडचणी येत होत्या. सर्व अडचणी पार करत रेस्क्यू पथक शेतात पोहोचल व तेथे झाडाच्या आश्रयाने असलेल्या बाजीराव उईके यांना बोटीत बसवून परत गावात आणले.