हॉटेलवर काम करणाऱ्या दोन बालकामगारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:23 AM2017-07-19T01:23:04+5:302017-07-19T01:23:04+5:30
अकोला: खडकी परिसरातील हॉटेल पूनमवर काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकामगारांची मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्तांच्या भरारी पथकाने सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: खडकी परिसरातील हॉटेल पूनमवर काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकामगारांची मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्तांच्या भरारी पथकाने सुटका केली. पोलिसांनी हॉटेलमालकाविरुद्ध भादंवि कलम ३७४ गुन्हा दाखल केला.
गोरक्षण रोडवरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक रमेश रामाजी बोरकर(५६) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी ते भरारी पथकासह शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, चहा टपरींची तपासणी करीत असताना, त्यांच्या पथकाला खडकी येथील हॉटेल पूनम येथे दोन अल्पवयीन बालकामगार काम करताना दिसून आले. त्यांनी बालकामगारांना ताब्यात घेतले. हॉटेलमालक राधेकिसन रणजित गुजर(३0, रा. कोळडी जि. भिलवाडा, राजस्थान) याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हॉटेल मालक राधेकिसन गुजर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७४, बालकामगार अधिनियम १९८६ नुसार गुन्हा दाखल केला. बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपरीवर अल्पवयीन मुले काम करताना दिसून येतात. त्यामुळे बालकामगारविरोधी पथकाने शहरातील हॉटेलांवर छापे घालून इतरही बालकामगारांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.