काटेपूर्णा नदीत वाहून गेलेल्या बापलेकास वाचविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:52 PM2020-09-21T18:52:37+5:302020-09-21T18:52:44+5:30
ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी नदीत उड्या घेतल्या.
निहिदा: पिंजर-बार्शीटाकळी मार्गावरील दोनदनजीकच्या पुलावरून जात असताना तोल जाऊन तीन वर्षाच्या मुलासह वडील काटेपूर्णा नदीपात्रात घसरले. नदीपात्रातील पाणी वाहत असल्याने ते दोघे जवळपास ५०० मीटरपर्यंत वाहत गेले. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. अखेर वाहून जाणाºया दोघे बापलेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी नासीर खान (३५) हे कारंजाहून पत्नीसह दोन वर्षांचा मुलगा यासीर खान (३) याला घेऊन दुचाकीने अकोलाकडे जात असताना पिंजर-बार्शीटाकळी मार्गावर दोनदनजीक पुलावर पाणी असल्याने थांबले. काटेपूर्णा धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. यावेळी वडील हे मुलाला पोटाशी दुपाट्याने बांधून पाणी पाहण्यासाठी पुलावरून जात असताना तोल जाऊन मुलासह नदीपात्रात कोसळले. यावेळी उपस्थित नागरिकांनी व मुलाच्या आइने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी नदीपात्रात उड्या घेऊन दोघाही बापलेकांना सुखरुप बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते दोघे जवळपास ५०० मीटर वाहत गेले होते. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा बापलेकांना पिंजर येथे प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी आईसह दोघा बापलेकांना कारंजा येथे घेऊन गेले.