अकोला ‘जीएमसी’त नवजात शिशूंच्या वाढीवर संशोधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 02:51 PM2020-01-14T14:51:30+5:302020-01-14T14:52:02+5:30
माहितीच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला सुरुवात करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यात संशोधनाचा अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मेडिकल रिसर्च कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अंतर्गत अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशूंच्या वाढीवर संशोधन करण्यात येत आहे. या अंतर्गत गत दोन वर्षात २ हजार शिशूंचे निरीक्षण करण्यात आले असून, यामध्ये नवजात शिशूंच्या वजनासह डोक्याचा घेर आणि उंचीदेखील मोजली जात आहे. या आधारावर शिशूंमधील कुपोषणावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होणार असल्याचा दावा संशोधक ांकडून केला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेअंतर्गत २०१४ ते २०१७ या कालावधीत जगातील आठ देशांमध्ये गर्भामध्ये शिशूंच्या वाढीवर अभ्यास केला आहे. यामध्ये भारताचा समावेश असून, नागपूरमध्ये या संशोधनाचे केंद्र होते. याच संशोधनाचा आधार घेऊन ‘इंटर ग्रोथ-२१’च्या आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार, अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांच्या वाढीवर संशोधन करण्यात येत आहे. साधारणत: ६ महिने ते ५ वर्षांआतील बालकांमध्ये सॅम आणि मॅम असे कुपोषणाचे निकष लावले जातात; मात्र हेच निदान गर्भातच किंवा जन्मत:च झाल्यास कुपोषणावर मात करण्यास मोठी मदत होईल.
संशोधनासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयातील नवजात बालकांचे निरीक्षण करण्यात आले. यासाठी डॉक्टरांना मेडिकल रिसर्च कौन्सिल आॅफ महाराष्ट्रमार्फत अनुदान मिळाले असून, गत दोन वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. हे संशोधन बालरोग तज्ज्ञ डॉ. ऊर्मिला देशमुख, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विनित वरठे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल आणि डॉ. अपर्णा वाहाणे यांच्या निरीक्षणात होत आहे.
विश्लेषणात्मक अभ्यास सुरू
संशोधनांतर्गत निरीक्षणातून २ हजार बालकांची माहिती मिळविण्यात आली आहे. उपलब्ध माहितीच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला सुरुवात करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यात संशोधनाचा अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.
नवजात बालकांच्या वाढीवर दोन वर्षांपासून अकोला जीएमसीत संशोधन सुरू आहे. संशोधनांचा अंतिम निष्कर्ष येणे बाकी आहे; परंतु या आधारावर कुपोषणापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होईल.
- डॉ. ऊर्मिला देशमुख, संशोधनक, जीएमसी, अकोला