मातीची धूप थांबविण्यावर संशोधन करा - डॉ. तपस भट्टाचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:53 PM2020-02-19T13:53:34+5:302020-02-19T13:53:49+5:30
राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
अकोला: दरवर्षी वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबविणे काळाची गरज असून, मातीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठीचे संशोधन करावे लागणार असल्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मंगळवारी अकोला येथे केले. ‘वातावरण अनुरू प दिशादर्शक कृषी तंत्रज्ञान’ विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन विकास विभागाचे उपमहसंचालक डॉ. एस. के. चौधरी (नवी दिल्ली), राष्टÑीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. पी. चंद्रण (नागपूर), नेदरलँड येथील सोलीदयरीडेड विद्यापीठाचे वरिष्ठ सहसंचालक डॉ.बरवाह स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन (परभणी), माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.बरवाह यांची उपस्थिती होती. त्यांनी दिर्घ मुदतीय सेंद्रीय खताचे व्यवस्थापनाचे कापूस पिकावर चांगले दूरगामी परिणार होतात असे सांगितले. विशेष म्हणजे रासायनिक खते कंपन्याचे संचालक या परिषदेला बहुसंख्यने उपस्थित होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ३५० शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशातील शास्त्रज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला. माती या विषयावर २७५ भित्तीपत्रके येथे लावण्यात आली होती. यातील सर्वोकृ ष्ट इत्थंभूत माहिती असलेली पाच शास्त्रज्ञांच्या पत्रकाची निवड करण्यात आली. दोन पदव्युत्तर व दोन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी याच विषयावर शोधप्रबंध सादर केले. या सर्वांचा येथे सन्मान करण्यात आला.
दोन दिवसीय परिषदेत माती, पाणी व बदलते हवामान, या विषयावर शास्त्रज्ञांनी मंथन केले असून, या शिफारशी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो टन सुपीक माती पाण्यासोबत वाहून जात आहे. अनेक भागातील मातीची जलधारणा क्षमता घटली आहे. मातीचे आरोग्य बिघडले आहे. एकूणच यावर तातडीच्या संशोधनाची गरज असल्याचे सर्वच तज्ज्ञांनी अधोरेखित केले.