आरक्षण जाहीर : जिल्ह्यातील सातपैकी पाच पंचायत समित्यांची सभापतीपदे महिलांसाठी राखीव!
By संतोष येलकर | Published: October 13, 2022 10:02 PM2022-10-13T22:02:20+5:302022-10-13T22:02:46+5:30
सातपैकी पाच पंचायत समित्यांची सभापतीपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असून, त्यामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) या प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन सभापती पदांचा समावेश आहे.
अकोला: जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सातपैकी पाच पंचायत समित्यांची सभापतीपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असून, त्यामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) या प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन सभापती पदांचा समावेश आहे.
उर्वरित दोन पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी एक सभापतीपद आरक्षित झाले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर,बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या विद्यमान सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कालावधीची मुदत संपली असून, पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील यापैकी पाच समित्यांची सभापतीपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन सभापतीपदे राखीव झाली असून, उर्वरित दोन पंचायत समित्यांमध्ये एक अनुसूचित जाती व एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतीपद आरक्षित जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, प्रमोद शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सदस्य व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण !
पंचायत समिती प्रवर्ग
अकोला अनुसूचित जमाती महिला
अकोट सर्वसाधारण महिला
बाळापूर सर्वसाधारण
पातूर नामाप्र महिला
तेल्हारा अनुसूचित जाती महिला
मूर्तिजापूर अनुसूचित जाती
बार्शीटाकळी सर्वसाधारण महिला