कंत्राटी कर्मचारी पदांसाठी आता आरक्षण
By admin | Published: July 10, 2015 12:03 AM2015-07-10T00:03:41+5:302015-07-10T00:03:41+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाचा आदेश.
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य आरोग्य सोसायटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध स्वरूपाच्या कंत्राटी नियुक्त्या र्मयादित कालावधीसाठी केल्या जातात. आता सदर कंत्राटी तत्त्वावरील पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले. याबाबतचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै रोजी दिले आहेत. राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित असून, या अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय रोगनियंत्रक व प्रतिबंध कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे. या राष्ट्रीय आरोग्य अभियानास केंद्र शासनाने सन २0१२- २0१७ या पंचवार्षिक योजनेत मुदतवाढ दिली आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीकडून ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात येणार्या सर्व कंत्राटी पदांना महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमा ती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग आरक्षण अधिनियम २00१ हा लागू आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्यांसाठी वा पदांसाठी सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले; मात्र या कर्मचार्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.
*असे आहे आरक्षण या आदेशानुसार सर्व कंत्राटी तत्त्वावरील पदांसाठी अनुसूचित जातीसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, विमुक्त जाती(अ) ३ टक्के, भटक्या जमाती(ब)साठी २.५ टक्के, भटक्या जमाती(क)साठी ३.५ टक्के, भटक्या जमाती(ड)साठी २ टक्के, विशेष मागास प्रवर्गला २ टक्के आणि इतर मागास वर्गासाठी १९ टक्के असे आरक्षण जाहीर केले आहे.