‘आरक्षण आमचा हक्क; सरकारने निर्णय घ्यावा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:44 PM2017-10-30T17:44:32+5:302017-10-30T17:47:05+5:30
‘आरक्षण आमचा हक्क असून, त्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा ’ अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी सोमवारी येथे केली.
अकोला : धनगर आरक्षण निर्णायक मेळावा रविवार, ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे, असे सांगत ‘आरक्षण आमचा हक्क असून, त्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा ’ अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी सोमवारी येथे केली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथील स्नेह नगर ग्राऊंड येथे धनगर आरक्षण निर्णायक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याच्या पृष्ठभूमीवर धनगर आरक्षण आणि सरकारची भूमिका यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला सर्वच पक्षातील आणि अपक्ष धनगर समाजाचे आमदार उपस्थित राहणार असल्याचे डॉ.महात्मे यांनी सांगीतले.आरक्षण आमचा हक्क असून, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने शिफारस करुन, तातडीने निर्णय घेतला पाहीजे, असे सांगत झारखंड, ओरिसा व बिहार या राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही आरक्षण मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. आम्ही आदिवासी आरक्षणाच्या विरोधात नसून, आदिवासी समाजाही धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही; मात्र काही आदिवासी नेत्यांचा विरोध असल्याचेही डॉ.महात्मे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ.किशोर मुखमाले, नगरसेविका सुमन गावंडे, अनंत कोरडे, अनंत कोरडे, उमेश अवघड,जगतपाल कोगदे यांच्यासह धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका !
आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता,धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची सकरात्मक भूमिका आहे, असेही डॉ.महात्मे यांनी यावेळी सांगीतले.