पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आज आरक्षण सोडत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:49 AM2020-01-13T10:49:02+5:302020-01-13T10:49:08+5:30
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत सोमवार, १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये प्रवर्गनिहाय पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, कोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पं.स. सभापतींची निवड १६ जानेवारीला !
जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवड १६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. सातही पंचायत समित्यांच्या विशेष सभा बोलाविण्यात येणार असून, त्यामध्ये सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांना विशेष सभेच्या नोटीस पाठविण्यात येणार आहेत.
जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारीला!
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे. विशेष सभेच्या नोटीस जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना सोमवारी पाठविण्यात येणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.