विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर युवासेनेत फेरबदल; नव्या दमाच्या शिवसैनिकांना संधी
By आशीष गावंडे | Published: July 12, 2024 10:26 PM2024-07-12T22:26:28+5:302024-07-12T22:27:38+5:30
शनिवारी विधानसभा मतदारसंघ-निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हाेणार असल्याची दाट शक्यता
आशिष गावंडे, अकोला: लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धवसेना आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या माेर्चेबांधणीसाठी सरसावल्याचे चित्र आहे. युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना सामील करण्यासाठी जिल्ह्याच्या युवासेनेत काही फेरबदल केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यासंदर्भात शनिवारी विधानसभा मतदार संघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हाेणार असल्याची दाट शक्यता आहे.
निवडणुका काेणत्याही असाेत,पक्षाला तरुण कार्यकर्त्यांची नेहमीच गरज भासते. निवडणुकीच्या कालावधीत हीच तरुणाइ जाेमाने कामाला लागून वातावरण निर्मीती करतात. राजकारण व समाजकारणाची आवड असलेले अनेक तरुण विविध पक्षांमध्ये सक्रिय हाेतात. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हापातळीवर युवासेना कार्यरत आहे.
अनेक दिवसांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसणारे काही पदाधिकारी संघटना वाढीपेक्षा चमकाेगिरीत व्यस्त राहत असल्याचे समाेर आल्यानंतर युवासेनेच्यावतीने जिल्हाकार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी १३ जुलै राेजी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, विभागीय सचिव सागर देशमुख, अकाेला जिल्हासंपर्क प्रमुख अॅड.संताेष धाेत्रे अकाेल्यात दाखल हाेणार आहेत.
प्रमुख पदाधिकाऱ्यांना डच्चू
युवासेनेतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख अशा प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या परंतु संघटनेसाठी निष्क्रिय ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे. यामध्ये नेमकी काेणाची वर्णी लागते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.