विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 03:32 PM2019-03-29T15:32:26+5:302019-03-29T15:32:33+5:30
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना डिसेंबर २०१८ पासूनचे विद्यावेतन थकीत आहे.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना डिसेंबर २०१८ पासूनचे विद्यावेतन थकीत आहे. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेतर्फे राज्य शासनाला पत्र पाठविण्यात आले असून, प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचाही इशारा ‘मार्ड’तर्फे देण्यात आला.
राज्यात नागपूर, अकोला, अंबेजोगाई आणि लातूर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या जवळपास एक हजार निवासी डॉक्टरांना गत तीन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. यामध्ये अकोल्यातील ९१ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. यापूर्वीदेखील निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाच्या समस्येला सोमोरे जावे लागले आहे. त्यावेळी निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. संप मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मानधन देण्याचा आदेश दिला होता. एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती; पण हे पैसे महाविद्यालयापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांसमोर पुन्हा विद्यावेतनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आचारसंहितेचे कारण पुढे करीत शासनातर्फे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मानधन वाढ आणि रखडलेल्या विद्यावेतनाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारादेखील डॉक्टरांनी दिला आहे.
जूनपर्यंत विद्यावेतन नाही!
मागील तीन महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळाले नाही. अशातच वेतनासाठी फंड नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत निवासी डॉक्टरांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.
आम्ही तासन्तास रुग्णसेवेसाठी झटत असतो; पण आता आमचा संयम संपत आहे. शासनाने आम्हाला आमचा हक्क द्यावा, यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर शासनासोबत चर्चा सुरू आहे. शासनाने प्रश्न निकाली न काढल्यास राज्यव्यापी आंदोलन करू.
- डॉ. क्रिष्णा ग्रीष्मा, जिल्हाध्यक्ष, मार्ड.