रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:06 PM2019-02-18T14:06:00+5:302019-02-18T14:41:42+5:30
अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
रिधोरा (अकोला): पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रति देशभर शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. हल्ल्याचा संताप प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे, तर दुसरीकडे शहिदांच्या बलिदानाचे अश्रू प्रत्येकाच्याच डोळ्यात आहेत. अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा हे गाव राष्टÑीय महामार्गावर आहे. या गावाच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावातील युवकांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवसाच्या अन्नत्यागाचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन शहिदांच्या प्रति असलेल्या संवेदना अधोरेखित केल्या. शनिवारी सकाळपासूनच गावातील व्यावसायिक संकुलने बंद ठेवली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळा ध्वज फडकविण्यात आला होता. सरपंचपती अनिल दंदी, पोलीस पाटील सुजय देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर देशमुख, मनोज अग्रवाल, धर्मेद्र दंदी, मंगेश गवई, कुंदन लोंढे, सय्यद इम्रान यांच्यासह नागरिकांनी अन्नत्यागाबाबत ग्रामस्थांनी माहिती देत त्यांचा सहभाग नोंदविला.
येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत शालेय पोषण आहाराची खिचडी नाकारून निषेध व्यक्त केला.
हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याचा फोटो चपलांचा हार घालून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून फोटोला शेण लावून चप्पल व खेटराने मारण्यात आले.
यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर प्रतीकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. गावातील जातीभेद विसरून सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.