५० काेटींचा ठराव; शासनाचे मार्गदर्शन मागितलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:07 AM2021-01-02T11:07:26+5:302021-01-02T11:07:45+5:30

Akola Municipal Corporation News सत्ताधारी पक्षाने ५० काेटींचा ठराव मंजूर केल्यावरून शिवसेनेने विराेधाची धार तीव्र केल्याचे दिसत आहे.

Resolution of 50 crore in Akola Municipal Corporation; Didn't ask for government guidance! | ५० काेटींचा ठराव; शासनाचे मार्गदर्शन मागितलेच नाही!

५० काेटींचा ठराव; शासनाचे मार्गदर्शन मागितलेच नाही!

Next

अकाेला : महापालिकेत सत्ताधारी भाजपने शहरातील प्रलंबित विकासकामे निकाली काढण्यासाठी २९ ऑक्टाेबर राेजीच्या सर्वसाधारण सभेत ५० काेटी रुपयांचा ठराव मंजूर केला. याविषयी प्रशासनाने राज्य शासनाचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित असताना आजपर्यंत यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. यामुळे सत्ताधारी पक्षासह राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपकडे बहुमत असूनही नगरसेवकांची प्रभागातील कामे निकाली निघत नसल्याची ओरड सत्तापक्षातील नगरसेवकांमधून केली जात आहे. मागील तीन वर्षांचा कालावधी पाहता नागरिकांच्या समस्या साेडविण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समाेर आले आहे. सभागृहात नगरसेवकांना चर्चा न करू देता भाजप मनमानीरीत्या ठराव मंजूर करीत असल्याचा आराेप विराेधी पक्ष शिवसेना व काॅंग्रेसच्या वतीने केला जात आहे. यामध्ये ५० काेटींच्या ठरावाची भर पडली असून, या प्रस्तावावर काेणतीही चर्चा न करता सत्ताधारी पक्षाने ५० काेटींचा ठराव मंजूर केल्यावरून शिवसेनेने विराेधाची धार तीव्र केल्याचे दिसत आहे. मनपात वेतनाची समस्या कायम असताना ५० काेटींचा निधी आणणार काेठून, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर यासंदर्भात ५० काेटींच्या निधीसंदर्भात शासनाचे मार्गदर्शन घेणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले हाेते. यासंदर्भात आयुक्त संजय कापडणीस यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद हाेता.

 

दाेन महिन्यांचा विलंब का?

सत्ताधारी पक्षाने २९ ऑक्टाेबर राेजी मनपाच्या आवारात सर्वसाधारण सभेचे आयाेजन केले हाेते. यावेळी शिवसेना, काॅंग्रेसमधील नगरसेवकांची बाजू ऐकून न घेता ५० काेटी रुपयांचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील दाेन महिन्यांपासून या विषयी शासनाचे मार्गदर्शन घेण्यात प्रशासनाकडून कुचराई केली जात असल्याचे समाेर आले आहे.

 

भाजपचे राष्ट्रवादीला झुकते माप

शहरातील विकासकामांसाठी ५० काेटींच्या निधीची गरज असल्याचे नमूद करीत सत्ताधारी पक्षाने प्रस्ताव मंजूर केला. ५० काेटींच्या निधीसह सुवर्णजयंती नगराेत्थान याेजना, नागरी दलितवस्ती सुधार याेजनेच्या निधी वाटपात भाजपने विराेधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील नगरसेवकांना झुकते माप दिल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी देऊन विराेधी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आराेप सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला आहे.

Web Title: Resolution of 50 crore in Akola Municipal Corporation; Didn't ask for government guidance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.