देशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:08 PM2018-08-17T15:08:53+5:302018-08-17T15:13:11+5:30
अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत.
अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत. यापैकी ३० गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले असल्याची माहिती गांधीवादी विचारवंत तसेच जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बा-बापू १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने बोबडे यांचा विदर्भ दौरा अकोल्यापासून सुरू झाला असून, गुरुवारी त्यांनी लोकमत कार्यालयात भेट देऊन संवाद साधला. बोबडे म्हणाले, की महात्मा गांधींचा विचार हा सर्वकालीन विचार आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गांधी विचारांची गरज अन् उपयुक्तता अधिक वाढताना दिसत आहे. कारण गांधी विचार हा प्रकाश देणारा विचार आहे. ज्या ज्या वेळी अंधार अधिक होत जाईल, त्यावेळी प्रकाशाचे महत्त्व अधिक वाढते, तसा हा विचार आहे. त्यामुळेच वाढती हिंसा व क्रूरता वाढीस लागत असताना गांधींची अहिंसा समाजाला दीपस्तंभासारखी वाटते. गांधींचा विचार हा मानवतावादी विचार आहे, त्यामुळे तोच धागा पकडून बा-बापूंच्या १५० जयंतीनिमित्ताने मानवतावादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. गांधी विचार संस्कार परीक्षा हा त्याचा एक भाग आहे. आजपर्यंत १४ लाख विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ही परीक्षा दिली आहे. अरुण गवळी यांच्यासारख्या तुरुंगात असलेल्या कैद्यानेही गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभाग घेऊन अहिंसा हेच खरे शस्त्र असल्याचे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गांधींचा मानवतावादी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, प्रदर्शन, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी कीर्तन अशा विविध माध्यमांचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बा-बापू १५० व्या जयंतीनिमित्त होणारे हे सर्व कार्यक्रम उत्सवी नसतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. उत्सवांपेक्षा कृतीवर भर, गांधींच्या संदर्भात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, त्यांच्याबाबत होणाºया खोट्या आरोपांना पुरारव्यानिशी उत्तर देणे यावर भर दिला जाणार आहे.