शिक्षक शिक्षकेतर प्रलंबित समस्या तत्काळ सोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:48+5:302021-03-13T04:34:48+5:30
मूर्तिजापूर: राज्यातील खासगी, स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व आदिवासी आश्रमशाळामधील सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ...
मूर्तिजापूर: राज्यातील खासगी, स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व आदिवासी आश्रमशाळामधील सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या दूर करण्याची मागणी करीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती विभागाचे विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार ५ मार्च रोजी शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले.
जयदीप सोनखासकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार तत्काळ अनुदान मंजूर करा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय सरसकट सर्वांना लागू करा, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०/२० /३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधाचा ११ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय रद्द करावा, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित पहिला व दुसरा हप्ता देण्यात यावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करावे व नियमित वेतन विलंबाने होण्यास जवाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अनुकंपा नेमणूक तत्काळ द्यावी, मागण्यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून व मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. निवेदन देताना विमाशी संघाचे अमरावती विभागीय कार्यवाहक जयदीप सोनखासकर, विमाशीचे अरविंद चौधरी, अमरावती महानगर कार्यवाह गजेंद्र शेंडे आदी उपस्थित होते.