जनता दरबारातून ६०३६ तक्रारींचे निवारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:58 AM2019-09-17T11:58:01+5:302019-09-17T11:58:09+5:30
६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले.
अकोला: गेल्या २४ महिन्यात घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी-समस्यांचे निवारण करण्यासाठी गत २४ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात १५ दिवसातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनता दरबार घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध ३६ विभागांसंबंधी ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या. जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, त्यासंदर्भात अनुपालन अहवाल प्राप्त झाले आहेत. जनता दरबारात नागरिकांकडून सर्वात जास्त तक्रारी प्राप्त होणाऱ्या चार विभागांमध्ये महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस विभागाचा समावेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सावकारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच शेतरस्त्यांची कामे व अतिक्रमणे हटविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, सामूहिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.
‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांना मान्यता!
अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांच्या आकृतीबंधाला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले.