वातावरणातील बदलांमुळे वाढताहेत श्वसन विकाराचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:48 AM2021-03-09T10:48:14+5:302021-03-09T10:48:24+5:30
Respiratory disorders are on the rise due to climate change दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री थंडी यामुळे सध्या श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वातावरणातील बदलामुळे इतरही आजार डोके वर काढत आहेत. अकाेल्याचा पारा हा ४० अंशाच्या घरात पाेहोचला आहे. दुसरीकडे किमान तापमानही १८ अंशापर्यंत खाली येत असल्याने दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री थंडी यामुळे सध्या श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत.
अकाेल्यात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. वातावरणातही बदल होत असल्यामुळे श्वसन विकारांचे रुग्णही वाढत आहेत. ही वाढ चिंताजनक आहे. दिवसभरात उकाडा, ढगाळ हवामान, पाऊस असे बदल शरीरासाठी हानिकारक आहेत. ताप, सर्दी, खोकला यांमध्ये वाढ होण्यास असे वातावरण कारणीभूत ठरते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. त्याचबरोबर मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे हात धुणे, अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपायांकडेही नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.
विषाणूजन्य आजार वाढण्याची शक्यता
एकाच दिवसात सर्व प्रकारचे हवामान हे आजारांना निमंत्रण देते. सध्या शहरात रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा आहे. दिवसभर उकाडा आहे. ढगाळ हवामान आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांच्या वाढीला पोषक वातावरण आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोणत्याही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
वातावरणातील बदलामुळे श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही हे पाहावे. त्यासाठी मास्कचा वापर करावा, लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक