‘बंद’ला प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्ता रोको!
By admin | Published: June 6, 2017 12:59 AM2017-06-06T00:59:53+5:302017-06-06T00:59:53+5:30
व्यापाऱ्यांचाही पाठिंबा : शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, भाजीपाला फेकला
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ जून रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच काही गावांमध्ये पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने बंद शंभर टक्के पाळला गेला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, दूध व इतर शेतमाल रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला.
अकोला तालुक्यातील गांधीग्राम, वल्लभनगर, बाभूळगाव जहाँगीरसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाळापूर तालुक्यात व्याळा, वाडेगाव व पारस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारस येथे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. तसेच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
व्याळा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा दिला. तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ७९ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. यामध्ये पारस फाटा येथील ३६, व्याळा १७ आणि वाडेगाव येथील २६ आंदोलकांचा समावेश आहे.
तेल्हारा शहरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य मार्गावर शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील खंडाळा गावात बंद, तर खंडाळा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. बार्शीटाकळी तालुक्यात महान, खेर्डा भागाई येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पिंजर येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांसह कृषी सेवा केंद्र संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथे महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून दूध, कांदा फेकून शासनाचा निषेध केला. पातूर शहरासह तालुक्यातील बाभूळगाव, चान्नी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या बंदला तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रं बंद होती. अकोट तालुक्यात वाई फाट्यावर शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर मुंडगाव येथे बंद पाळण्यात आला.
मूर्तिजापूरमध्ये आठवडी बाजार आज बंदचे आवाहन
मूर्तिजापूर तालुक्यातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ६ जून रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणू नये, तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी जाऊ नये,असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.