अकोटात ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:32 PM2020-07-04T12:32:57+5:302020-07-04T12:33:26+5:30

सर्वपक्षीय नेत्यासोबतच प्रशासनसुद्धा या जनता कर्फ्यूकरिता रस्त्यावर उतरले होते.

Response to 'Janata Curfew' in Akota | अकोटात ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद

अकोटात ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपर्क साखळी तोडण्यासाठी पुकारलेल्या सर्वपक्षीय जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी ३ जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यासोबतच प्रशासनसुद्धा या जनता कर्फ्यूकरिता रस्त्यावर उतरले होते. या जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
जनता कर्फ्यूसंदर्भात बचत भवनमध्ये पालकमंत्री बच्चू कडू व स्थानिक अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेते, व्यापारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत ३ जुलै ते ९ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठ बंद होती. शहरातील कानाकोपऱ्यातील दुकाने बंद होती. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ९० गावात जनता कर्फ्यू कडेकोट पाळण्यात आला होता. शहर व ग्रामीण भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. शहरातील रस्त्यावर फळ विक्रेता, फेरीवाले यांनीसुद्धा बंद पाळला.
शहरातील दवाखाना, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा सुरू होती. तसेच बँका सुरू होत्या. रस्त्यावर अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणारे लोक आढळून आले.
महसूल, नगर परिषद, आरोग्य व पोलीस प्रशासनासोबतच जनता कोरोना योद्ध्याची भूमिका बजावली. ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, इतर पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडेकोटपणे जनता कर्फ्यू पाळला. दरम्यान, शुक्रवारी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. सद्यस्थितीत शहरातील १९ व ग्रामीण भागातील तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: Response to 'Janata Curfew' in Akota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.