पातूर तालुक्यात लसीकरणाला प्रतिसाद; ९३१ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:19+5:302021-03-16T04:19:19+5:30
एकूण रुग्णसंख्या पोहोचली ७१७ वर : ६५० रुग्णांची कोरोनावर मात पातूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. ...
एकूण रुग्णसंख्या पोहोचली ७१७ वर : ६५० रुग्णांची कोरोनावर मात
पातूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. त्यात पातूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, तालुक्यात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९३१ जणांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ७१७ वर पोहोचली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील ६७ रुग्णांवर उपचार सुरू असून, सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. पातूर तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासनामार्फत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडीबाजार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, आठवडीबाजार भरत असल्याचे चित्र आहे. सोमवारी तालुक्याला दिलासा मिळाला असून, एकाही संदिग्धांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
-----------------------------------------------------
या ठिकाणी लसीकरण सुरू
पातूर तालुक्यातील पातूर, आलेगाव, सस्ती, मळसूर आदी आरोग्य केंद्रांमध्ये ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण सुरू आहे. तालुक्यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.
-------------------------------------
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत ६० वर्षांवरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील दुर्धर आजारग्रस्त कोविड लसीकरण केले जात आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी लसीकरण करावे. तसेच शहरात कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना सौम्य लक्षणे असतील, त्यांनी त्वरित तपासणी करावी. त्रिसूत्रीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
-डॉ. चिराग रेवाळे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर
-------------------------------------------------
आतापर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य केंद्र एकूण संख्या
पातूर ५४०
आलेगाव १५२
सस्ती १४७
मळसूर ९२
एकूण ९३१