महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सर्वांची - रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:08 PM2018-07-23T15:08:40+5:302018-07-23T15:10:54+5:30
महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
अकोला - अकोला पोलिसांनी समाजातील महिलांच्या सुरक्षा व सबलीकरणासाठी राबविलेला जननी-२ हा उपक्रम कौतुकास्पद असून, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
मराठा मंडळ सभागृहात आयोजित जननी-२ उपक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जननी-२ उपक्रम प्रभावीरीत्या राबविल्याने अकोला पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. यासोबतच सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जननी-२ उपक्रम हा महिलांसाठी त्यांचे हक्क व अधिकार जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले, तर प्राचार्य बी. जी. शेखर यांनीही या उपक्रमाचा महिलांना चांगला फायदा होणार असून, त्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असल्याचे सांगितले. तर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी अकोला पोलीस प्रशासनातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने हा उपक्रम घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगत या पोलिसांचे आभार मानले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी महिला सबलीकरण कार्यक्रमाचे वृत्तांत वाचन केले व शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात किरण सुरज जरांगे, पृथ्वी विशाल काकड, इशानी किरण साठे, साक्षी उमेश गायधने, स्वप्ना चेतन चौधरी आदींनी कबड्डी, सांस्कृतिक, कथ्थक, बॉक्सिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उप विभागीय पोलीस अधीकारी सुनील सोनोने, कल्पना भराडे, सोहेल शेख, पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पत्नी तन्वी सागर, नीता पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.