मूर्तिजापूरमधून प्रतिबंधित गुटखा जप्त
By admin | Published: December 9, 2014 12:31 AM2014-12-09T00:31:43+5:302014-12-09T00:31:43+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
अकोला/मूर्तिजापूर - मूर्तिजापूर येथील स्टेशन रोडवर असलेल्या सुभाष चौकातील एका गुटखा माफियाकडून सुमारे १२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सोमवारी जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा मारून हा गुटखा जप्त केला. त्यानंतर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुटखा माफियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूर्तिजापूर येथील रहिवासी गजानन अशोक अग्रवाल यांच्या स्टेशन रोडवरील सुभाष चौकामध्ये ओम जनरल व पान मसाला दुकानांमध्ये प्रतिबंधित गुटखा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्यांना मिळाली. यावरून पथकाने सोमवारी दुपारी ओम जनरल व पान सेंटर येथे छापा मारून सुमारे १२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यामध्ये सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व किवाम यासह प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा समावेश आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. एम. कोलते यांच्या मार्गदर्शनामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व सहाय्यक नरवने यांनी केली. त्यानंतर नवलकार यांनी या प्रकरणाची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केली. यावरून पोलिसांनी गुटखा माफिया गजानन अशोक अग्रवाल याच्यावर कलम ३२८, १७३ व १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.