रेल्वेस्थानकावर सिटी बसला मज्जाव!
By admin | Published: March 3, 2017 01:25 AM2017-03-03T01:25:58+5:302017-03-03T01:25:58+5:30
आॅटोचालकांनी गाठला मनमानीचा कळस
अकोला, दि.२ : सर्वसामान्य अकोलेकरांच्या सुविधेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या सिटी बसेसवर दगडफेक करण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रेल्वेस्थानक परिसरातून वळसा घेणाऱ्या सिटी बसला मज्जाव करण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातील आॅटोचालकांनी मनमानीचा कळस गाठत बस सेवा बंद करण्याची धमकी दिली. या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर १ मार्च रोजी रेल्वेस्थानक परिसरातील आॅटोचालकांनी रेल्वेस्थानक चौकात सिटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेला अवघा एक दिवस उलटत नाही तोच गुरुवारी सायंकाळी रेल्वेस्थानक परिसरात शिरण्यास सिटी बस चालकांना आडकाठी घालण्याचा प्रकार घडला. पहिल्या टप्प्यात मोजक्या प्रमुख रस्त्यांवरून बस सेवा सुरू करण्यात आली असून बस सेवेला अकोलेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. ही बाब आॅटोचालकांना खटकत असल्यामुळे की काय, रेल्वेस्थानक परिसरात शिरण्यापासून सिटी बस चालकांना रोखण्यात आले.
यासंदर्भात श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी मनपा उपायुक्त समाधान सोळंके, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांना अवगत केले असता मनपा अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसरात धाव घेतली. सिटी बसला रेल्वेस्थानकावरून वळसा घेता येणार नसल्याचा रेटा आॅटोचालकांनी लावून धरला. रेल्वेस्थानकाची जागा मनपाच्या मालकीची असल्याने तुमची मनमानी खपवून घेणार नसल्याचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी स्पष्ट केले. यापुढेही काही हरकत असल्यास थेट मनपा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याची सूचना उपायुक्तांनी केली.
सिटी बसेसला रेल्वेस्थानक परिसरातून वळसा घेण्यास आॅटोचालकांनी मज्जाव केला. हा प्रकार हास्यास्पद आहे. आॅटोचालकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. ही बस सेवा अकोलेकरांच्या सुविधेसाठी आहे. यापुढे सिटी बसला आडकाठी निर्माण केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
- समाधान सोळंके, उपायुक्त, मनपा