पुन्हा निर्बंध, दुकाने चार वाजेपर्यंत सुरू, शनिवार-रविवार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 09:53 AM2021-06-26T09:53:29+5:302021-06-26T09:53:37+5:30
Restrictions again in Akola : निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
अकोला : राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याने अकोल्यात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील निकषानुसार निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतला आहे. हे निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरू लागली असून जवळपास सर्वच बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली आहे. अशातच राज्यात कोविडच्या डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आल्याने राज्य शासनाने सतर्कतेची भूमिका घेत राज्यभरात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अकोला जिल्ह्यात सोमवार २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक होणार असून जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र वीकेंडला औषधांची प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
सोमवार ते शुक्रवार काय सुरू राहील
अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
दूध विक्री केंद्र, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण केंद्र - सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजतापर्यंत)
बिगर अत्यावश्यक दुकाने - सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू (शनिवार, रविवार बंद)
हॉटेल, खानावळ, रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. शनिवार, रविवार घरपोच सेवा सुरू राहील.
जिम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. एसी बंद ठेवूनच चालू राहतील.
सार्वजनिक मैदाने, आउटडोर गेम्ससाठी दर दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
खासगी, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये - नियमित
अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.
सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ५० टक्के उपस्थितीत (पूर्वपरवानगीने)
स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, अकोला जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात येत आहेत. या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला