ग्रामविकास अधिका-यानेच केली स्वच्छता, सफाई कामगार स्वच्छता करीत नसल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:07 PM2018-06-14T17:07:09+5:302018-06-14T17:07:09+5:30
स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
डोणगांव : स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. याठिकाणी सफाई कामगारही वेळेवर आले नाही; परंतू त्यांची वाट न बघता ग्रामविकास अधिका-यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमामुळे ग्रामपंचायतचे चित्र बदलले आहे.
महाराष्ट्र शासन जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्चून स्वच्छता अभियान राबवित असतानाच डोणगांवमध्ये ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महिलांनी ग्रामपंचायत गाठून समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच जुबेरखान, सदस्य साबीरभाई, कासम बागवान यांच्यासह आठवडी बाजार वार्ड नं.सहा ची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना अस्वच्छता आढळून आली. यावर ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामपंचायतचे कर्मचारी व कचरा गाडी बोलावून घेतली सफाई कामगार न आल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई कामगारांची भूमिका बजावली. ग्रामविकास अधिकाºयांनी रस्त्यावरील घाण उचलून गाडीत टाकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परमाळे, जीवन खडसे, श्याम खोटे, सचिन पहाडे सह कासम बागवान यांनीही ग्रामविकास अधिका-यास सहाय्य केले. त्यानंतर कोणीही रस्त्यावर घाण टाकू नका व स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी गावक-यांना केले. आठवडी बाजारात रस्त्यावर बसून अनेक व्यापा-यांनी अतिक्रमण केल्याने अडथळा निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी स्वत: कर्मचा-यासह जाऊन अडथळ्याचे अतिक्रमण काढून रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाई केल्या जाईल, अशी सुचनाही रस्त्यावर बसणा-यांना केल्या. त्यामुळे अचानक मरगळ आलेल्या ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकाºयाने केलेल्या कामामुळे हुरुप आल्याचे दिसून येत आहे.
अन्यथा सफाई कामगारांवर कारवाई
डोणगाव आठवडी बाजार व प्रत्येक वार्डात सफाई कामगाराच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता निर्माण झाल्याने आपण सफाई कामगारांना नोटीस दिल्या असून दोन दिवसात सफाई कामगारांनी सफाई न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक बुरकुल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.