दर्शकसंख्या अन् पसंतीच्या आधारे ‘बीज प्रक्रिया’ स्पर्धेचा निकाल जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:24+5:302021-08-20T04:23:24+5:30
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया ऑनलाईन स्पर्धेचा निकाल अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ( १५ ऑगस्ट रोजी) ...
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया ऑनलाईन स्पर्धेचा निकाल अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ( १५ ऑगस्ट रोजी) जाहीर करण्यात आला. त्यामध्ये बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करताना स्पर्धक शेतकऱ्यांनी बनविलेल्या व्हिडीओंना मिळालेली दर्शकसंख्या आणि पसंतीच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, राज्यस्तरावर विजेत्या पाच शेतकऱ्यांसह पाच मुलांची निवड करण्यात आली आहे.
शासनाचा कृषी विभाग, सहायक कृषी अधिकारी परिवार, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम बीज प्रक्रिया ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील ६ हजार २०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ३९० स्पर्धक शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करतानाचे व्हिडीओ बनवून सक्रिय सहभाग नोंदविला. प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओंना मिळालेली दर्शकसंख्या आणि पसंतीच्या आधारे बीज प्रक्रिया स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये बीज प्रक्रियेच्या व्हिडीओंना सर्वाधिक दर्शकसंख्या आणि पसंती मिळालेल्या राज्यातील पाच स्पर्धक शेतकऱ्यांसह बालकांमधून पाच मुलांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धक शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार आहे.
असे आहेत विजेते शेतकरी...
बीज प्रक्रिया ऑनलाईन स्पर्धेच्या निकालात राज्यस्तरावर पाच स्पर्धक विजेत्या शेतकऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील संजय पवार (प्रथम), कमलाकर भोइटे (व्दितीय), शुभम जाधव (तृतीय), नाशिक जिल्ह्यातील वंदना जाधव (चतुर्थ) व अहमदनगर जिल्ह्यातील नीलेश गायकवाड (पाचवा क्रमांक) इत्यादी पाच शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तसेच बालगटातून अहमदनगर जिल्ह्यातील सुदीक्षा कदम (प्रथम) , अंजली केणे (व्दितीय), सोलापूर जिल्ह्यातील शिल्पाराणी आसबे (तृतीय), सांगली जिल्ह्यातील पल्लवी व दुर्गेश्वरी पाटील (चतुर्थ ) आणि सातारा जिल्ह्यातील स्वरूप व सार्थक लाड (पाचवा) इत्यादी विजेत्या मुलांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातून
अंजली देशमुख प्रथम!
बीज प्रक्रिया ऑनलाईन स्पर्धेच्या निकालात अकोला जिल्ह्यातून भांबेरी येथील महिला शेतकरी अंजली वैभव देशमुख यांनी प्रथम, दिग्रस येथील शेतकरी नागोराव जनार्धन ताले यांनी व्दितीय व तामसी येथील शेतकरी राम माणिकराव काळे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे, असे कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख यांनी सांगितले.